हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली. राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलच्या भावावर बोलण्याचा अधिकार नाही असे ते म्हणाले.
आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील दरात कोणतीही कपात केलेली नाही. गुजरातपेक्षा महाराष्ट्रात 10 रुपयांनी महाग पेट्रोल मिळत आहे. त्यामुळे आता महाविकासआघाडीच्या नेत्यांना पेट्रोल-डिझेलच्या दरांवर बोलण्याचा कोणताही हक्क उरलेला नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
या अर्थसंकल्पाने शेतकरी आणि सामान्य लोकांच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तसेच आजच्या अर्थसंकल्पात प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही मदत देण्यात आली नाही. तसेच मूळ कर्जमाफी योजनेतही 45 टक्के शेतकरी वंचित राहिले होते. त्यांच्यासाठीही अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही असेही फडणवीस म्हणाले.
महाविकासआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत शून्य व्याजदराने कर्ज देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही योजना संपूर्णपणे फसवी आहे. महाराष्ट्रातील 80 टक्के शेतकरी हे लहान आणि कोरडवाहू शेती करणारे आहेत. या शेतकऱ्यांना 50 हजार ते एक लाखांपर्यंतच कर्ज घेणे झेपते. त्यामुळे या कर्ज योजनेचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’