हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्यात आल्यानंतर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हालचाली वाढवण्यात आल्या आहेत. आता भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यवतमाळ येथील उमरखे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. यासंदर्भात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याबाबत थोबाड फोडण्याची भाषा केली होती. यावरून आता मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजू पडगिलवार यांच्याकडून तक्रार अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राणेंच्या वक्तव्यानंतर याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र्भर उमटले. अनेक ठिकाणी शिवसैनिकां कडून दगडफेक, राडा करत निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर आता भाजपनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात मास्टर प्लॅन आखला आहे. दरम्यान आज यवतमाळ इथे भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशात ठाकरेंविरोधात ऑनलाईनही तक्रार दाखल
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उत्तर प्रदेशात ऑनलाईन तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले होते?
तीन वर्षांपूर्वी पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते कि, “शिवरायांना राज्याभिषेक करताना तिथून या ठिकाणी गागाभट्ट आले होते. उत्तर प्रदेशातून गागाभट्ट आले होते. त्यांनी किती सन्मानाने शिवरायाला राज्याभिषेक केला. आणि हा योगी आला.. अशी टरटरुन..कसलं काय नसलं की… म्हणजे गॅसचा फुगा असतो ना, काही नसते गॅस असतो, पण हवेत उडत असतो, तसा हा गॅसचा फुगा आहे. आला तो सरळ चपला घालून महाराजांना हार घालायला गेला.. सरळ चपला घालून.. अअसे वाटले कि त्याच चपला घ्याव्या आणि त्याचे थोबाड फोडावे… लायकी तरी आहे का तुझी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहण्याची…,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते.