मुंबई । अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला अटक केल्याप्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. हे प्रकरण 2018चं प्रकरण असताना गोस्वामी यांना आता अटक करण्यात येत आहे. पोलीस आतापर्यंत झोपले होते का?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भारतातील नामवंत पत्रकार अर्णब गोस्वामी यांना इतर कोणत्याही प्रकरणात अडकावता येणार नाही म्हणून एका वास्तुविशारदाच्या आत्महत्या प्रकरणी अडकवण्यात येत आहे. 2018 सालीच ही केस बंद झाली होती. ती केवळ आणि केवळ सुडाच्या भावनेने पुन्हा उघडली गेली आणि त्यांना अटक करण्यात आली. भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी घटना आज घडली आहे. मी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि त्याहून आधी एक भारतातील नागरिक म्हणून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे.
अर्णव गोस्वामी यांना अटक केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी आणि राज्यातील जनतेने मोर्चा काढावा, उपोषण करावं आणि आंदोलने करावीत, असं आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी केलं. अर्णव अटक प्रकरणी सोशल मीडियावरूनही आवाज उठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. राज्यात हुकूमशाही लागू करू शकतो असं या सरकारला वाटत आहे. पण महाराष्ट्रात हा प्रकार कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आजच्या पिढीला देखील इंदिरा गांधींच्या आणीबाणीची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो. त्यावेळी देखील जनतेने सरकारला संविधानाच्या विरुद्ध कारवाई करताना थांबविले होते, आता देखील थांबवत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. (chandrakant patil reaction on arnab goswami arrest)
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या हाती काही पुरावे लागले असतील. त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली असेल, असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले. राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून कुणावरही सूडबुद्धीने किंवा बदलाच्या भावनेतून कारवाई करण्यात आलेली नाही, असा दावाही राऊतांनी केलाय. अर्णव गोस्वामी यांनी गेल्या काही महिन्यात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून राज्य सरकारवर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्या आरोपांबाबत संबंधित चॅनेलची चौकशी करावी, अशी मागणीही राऊतांनी केली आहे.
काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अक्षता नाईक यांच्या तक्रारीची दखल घेत 26 मे 2020 रोजी सांगितलं होते की, “आज्ञा नाईक (अन्वय नाईक आणि अक्षता नाईक यांची मुलगी) यांनी अर्णब गोस्वामींच्या रिपब्लिकनं पैसे थकवल्यानं वडील आणि आजीनं आत्महत्या केल्याच्या प्रकरणाची रायगड पोलीस तपास करत नाहीत, अशी तक्रार केली. त्यानंतर मी सीआयडीला या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.”
काय आहे प्रकरण ?
अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग तालुक्यातील कावीर येथील फार्म हाऊसवर गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांची आई कुमुद नाईक (84) त्यांचाही मृतदेह तेथेच आढळून आला होता. अन्वय नाईक हे पेशाने वास्तुविशारद होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.
अन्वय यांची कॉनकॉर्ड कंपनी इंटेरिअर डिझायनरचे काम करते. अन्वय यांच्या कंपनीने रिपब्लीक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी काम केले होते. केलेल्या कामाचे पैसे त्यांच्याकडून सातत्याने अन्वय यांनी मागितले होते. मात्र, अर्णब गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा ते देण्यास टाळाटाळ करत होते, तर दुसरकडे अन्वय यांनी ज्या व्यापारी, व्यावसायिक यांच्याकडून माल उचलला होता त्यांनीही पैशाचा तगादा लावला होता, परंतु समोरून पैसे येत नसल्याने अन्वय यांना नैराश्य आले असावे असा अंदाज आहे. अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. याच कामाचे अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यानं अन्वय नाईक यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप अक्षता नाईक यांचा आहे.
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष तपास पथक
हाय प्रोफाईल केसमुळे रायगड पोलिसांनी तपासासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक तयार केले. सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आर्थिक व्यवहारांची खातरजमा करण्यासाठी हे तपास पथकाने अन्वय यांच्या मुंबईतील कार्यालयाची तपासणी केली. तपासणीदरम्यान तपासाची पुढील दिशा निश्चित होण्यास चांगलीच मदत मिळाली असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितल.
कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in