हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील निवडणुकीची आज मतमोजणी पार पडली आहे. या निवडणूकीत नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे विजयी झाले आहेत. दरम्यान या विजयानंतर बावनकुळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला. या निवडणुकीत जो प्रभाव झाला आहे तो नाना पटोलेंचा झाला आहे, ज्याचे मंत्रीच त्यांचं ऐकत नाही, हे कसले प्रदेशाध्यक्ष. ते जोपर्यंत प्रदेशाध्यक्ष आहेत तोपर्यंत काँग्रेस निवडणूक जिकू शकत नाही, अशी टीका बावनकुळे यांनी केली आहे.
निवडणुकीच्या विजयानंतर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, या ठिकाणी जी निवडणूक झाली ती भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत झाली होती. इतिहासात पहिलीच घटना अशी आहे की, काँग्रेसने पहिल्यादा चोवीस तासात आपला उमेदवार बदलला. हुकुमशाही मुघलशाहीने पक्ष चालवणे याचं हे उदाहरण आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोन मंत्र्यांच्या दबावाखाली आले. त्यांनी उमेदवार बदलला. एका तिकीट दुसऱ्याला मतं टाकायला लावले. ही पक्षातील हुकुमशाही मतदारांना, जनतेला मान्य नव्हती.
आजच्या प्रभावामुळे काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. याचा मोठा फटका विदर्भात काँग्रेसला बसणार आहे. छोटू भोयर यांनी देखील स्वत:ला मतदान केलं. त्यांनी देखील काँग्रेसला मतदान केलं नाही. यानंतर महाराष्ट्रात संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि यानंतर ज्या निवडणुका होतील त्यात भाजपच जिंकणार आहे”, असा विश्वास यावेळी बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.