सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी शिवेंद्रराजेंना टक्कर देण्यासाठी भाजपमधूनच उमेदवार आयात करणार असल्याचे बोलले जाते आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांना राष्ट्रवादी आयात करून शिवेंद्रराजेंच्या विरोधात मैदानात उतरवणार असल्याचे बोलले जाते आहे.
दीपक पवार यांनी शिवेंद्रराजेंना गेल्यावेळी चांगलीच टक्कर दिली होती. शिवेंद्र राजेंना टक्कर दिल्यानेच त्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदी नेमणूक करून भाजपने त्यांना बळ देण्याचा प्रयत्न केला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे २२ सप्टेंबरला सातारा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या दरम्यान दीपक पवार हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शकता आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपमध्ये गेलेल्या अनेक नेत्यांना धक्का बसणार आहे. तर शिवेंद्रराजेंच्या विरोधात राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळणार आहे.
दीपक पवार यांनी याआधी शिवेंद्र राजेंना दोन वेळा विधानसभा निवडणुकीत आव्हान दिले आहे. मात्र शिवेंद्रराजे दोन्हीही निवडणुकीत पवारांना वरचढ ठरले आहेत. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादी शिवेंद्र राजेंना पराभूत करण्यात यश मिळवते का? हे देखील बघण्यासारखे राहणार आहे.