जळगाव । राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. त्यात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही खरमरीत शब्दात प्रत्युत्तर दिलं. या पत्रव्यवहारावरुन आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खेद प्रकट केला आहे.राज्यपालांना प्राप्त होणारी निवेदने राज्यपाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवत असतात. त्याचप्रमाणे मंदिरं उघडण्यासाठीची निवेदन देखील राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मात्र, त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेले उत्तर दुर्दैवी असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लॉकडाऊननंतर आता मुख्यमंत्र्यांनी पुनश्च हरीओमचा नारा दिलाय. त्यानुसार राज्यात आता जवळपास सगळं सुरु झालंय. राज्यात मदिरालये सुरु होतात पण मंदिरे नाही ही खेदाची बाब आहे, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्य सरकारने मदिरालये आणि बार सुरु केलेत. इतकेच नव्हे तर पर्यटन विभागाच्या पत्राचा आधार घेत वेळ देखील वाढवून दिला. तर मग मंदिरांचे एवढे वावडे का?, असा सवाल विचारत देशातील इतर राज्यात देखील मंदिरे सुरु आहेत. मंदिरामुळे कोरोना वाढला असं चित्र नाही, असं फडणवीस म्हणाले.
मंदिरांमुळे केवळ भाविकांचीच आभाळ होते असं नाही तर त्याचा छोट्या व्यावसायिकांनाही फटका बसतो. त्यामुळे सरकारला सुबुद्धी मिळो आणि लवकरात लवकर मंदिरं उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, असं ते म्हणाले. या तीन पक्षांच्या सरकारमध्ये स्वत:ला हिंदुत्ववादी समजणारी शिवसेना देखील आहे. त्यांच्या राज्यात इतका मोठा अन्याय का? असा प्रश्नही फडणवीस यांनी उपस्थित केला. (Devendra fadanvis Criticized CM Uddhav Thackeray on his reply Bhagatsinh Koshyari)
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”