जळगाव | जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR scam) पतसंस्थेतील घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा भाजपचे नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) करत असले तरी जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी महाजनांवर केलेल्या नव्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे. दोन महिन्यांपूर्वीच गिरीश महाजन यांनी त्यांची पत्नी साधना महाजन यांच्या नावे 25 कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या दीड कोटी रुपयात केल्याचा खळबळजनक आरोप जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे.
पारस ललवाणी यांनी रविवारी सायंकाळी जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ललवाणी यांनी गिरीश महाजन यांचं थेट नाव घेऊन हे आरोप केले. ललवाणी यांनी बीएचआर पतसंस्थेतील गैरव्यवहार, जामनेरातील शिक्षण संस्था हडपण्याच्या प्रकरणासह गिरीश महाजन यांनी आपल्या राजकीय विरोधकांवर कशा पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून छळ केला याची माहिती दिली. यावेळी त्यांनी जामनेर नगरपालिकेत अनेक गैरव्यवहार झाल्याचे सांगत गिरीश महाजन यांच्यावर अनेक खळबळजनक आरोप केले. तसेच या पतपेढीच्या अनेक मालमत्ता महाजन आणि त्यांच्या मित्रांनी कवडीमोल भावात घेण्याचा सपाटा लावला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
महाजन यांच्या जमीन खरेदीची चौकशी व्हावी
जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाच्या प्रकरणात अड. विजय पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शनिवारी विजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन गिरीश महाजन यांना त्यावर प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर रविवारी पारस ललवाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन महाजन यांना लक्ष्य केले. बीएचआर पतसंस्थेचा गैरव्यवहार तसेच मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या वादाशी आपला संबंध नसल्याचे महाजन म्हणत आहेत. पण, ही वस्तुस्थिती नाही. बीएचआर पतसंस्थेच्या अनेक मालमत्ता महाजन व त्यांच्या संबंधित लोकांनी खरेदी केल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वीच 25 कोटी रुपयांची एक मालमत्ता त्यांनी अवघ्या दीड कोटी रुपयांत पत्नीच्या नावे घेतली. मग बीएचआरशी आपला संबंध नाही हे ते कसे म्हणू शकतात? असा सवाल करतानाच महाजन यांनी जामनेरात अनेक जमिनी कवडीमोल भावात घेतल्या आहेत. अनेक जमिनींचे ते मालक आहेत. ही माया कशी जमवली? याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही ललवाणी यांनी केली.
आमचा बोलविता धनी कुणी नाही
आपल्याविरोधात तक्रार करणाऱ्यांचा बोलविता धनी दुसरा कुणीच असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता. त्यालाही ललवाणी यांनी उत्तर दिलं आहे. आमच्या मागे कुणीही नाही. आम्ही स्वतः तक्रारीसाठी पुढे आलो आहोत, असे ललवाणी यांनी स्पष्ट केले. जामनेर एज्युकेशन संस्था बळकावण्यासाठी महाजन यांनी संस्थेच्या संचालकांवर खोटे गुन्हे दाखल केले. प्रत्येक संचालकाचा छळ केला, धमक्या दिल्या. प्रशासनातील अधिकारी, पोलिसांकडून दबाव आणला, दमदाट्या केल्या, एका महिलेवर महावीर जयंतीच्या दिवशी खोटा गुन्हा दाखल करून रात्रभर कोठडीत डांबले, असा आरोपही ललवाणी यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’