मुंबई । काही दिवसांपूर्वी राज्यसभेत कृषी विधेयकावरुन गदारोळ घालणाऱ्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांनतर उपसभापतींच्या वर्तनाच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी एक दिवस उपोषण केले, त्याला शरद पवार यांनीही एक दिवस अन्नत्याग करून समर्थन दिलं होतं. त्यावर आता भाजप नेते विनोद तावडे यांनी उपहासात्मक टीका केली आहे. ‘शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं, तर अधिक बरं वाटलं असतं’ असं तावडे यांनी म्हटलं. टीव्ही ९ वृत्तवाहिनीने यासंबंधीचे वृत्त दिलं आहे.
“मराठा समाजाला कसं डावलायचं हे या सरकारला माहित असून शरद पवारांनी मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केलं असतं, तर अधिक बरं वाटलं असतं,” असा टोला लगावत विनोद तावडेंनी कृषी विधेयक म्हणजे मोदी सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना आहे असं म्हटलं . शरद पवारांसारख्या नेत्याने विरोधासाठी विरोध करणं शेतकऱ्यांना पटलेलं नाही असं विनोद तावडे यांनी सांगितलं. शरद पवारांना काही बदल सुचवायचे होते तर त्यांनी राज्यसभेत ते मांडणं गरजेचं होतं, सरकारने त्यांचं नक्की ऐकलं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.
म्हणून शरद पवार यांनी अन्नत्याग केला होता..
“राज्यसभेत कृषिविषयक विधेकांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांना काही भूमिका मांडायची होती, परंतु त्यांना बोलू न देता, आवाजी मतदानाने विधेयक मंजूर करून घेणं, हे उपसभापतींचे वर्तन सभागृहाचं आणि त्या पदाचंही अवमूल्यन करणारे होते,” अशी टीका पवारांनी केली होती. राज्यसभेच्या उपसभापतींच्या या वर्तनाच्या निषेधार्थ विरोधी सदस्यांनी एक दिवस उपोषण केलं, त्याला पवार यांनीही एक दिवस अन्नत्याग करून समर्थन दिलं होतं. “उपसभापती हरिवंशसिंग यांनी नियमांना महत्त्व न देता सदस्यांचे मूलभूत अधिकार नाकारले. पुन्हा जे सदस्य उपोषण करत आहेत त्यांना चहापान घेऊन ते गेले मात्र त्या सदस्यांनी त्यांचा चहापान नाकारला. चहाला हात पण लावला नाही ते बरंच झालं,” असेही पवार म्हणाले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.