मुंबई प्रतिनिधी | भाजपचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार हे आता जवळपास निश्चित झाले असून महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री चंद्रकांत पाटील हेच भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष पदावर चंद्रकांत पाटील गेल्यानंतर ते मंत्री पदावर देखील कायम राहणार आहेत.
रावसाहेब दानवे यांची बेताल वक्तव्य पक्षाला नुकसान पोचवत असल्याचे लक्षात येताच भाजपने दानवे यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांना सन्मानपूर्वक केंद्रीय मंत्री मंडळात समाविष्ट करून दानवेंनी रीतसर प्रदेशाध्यक्ष पदापासून दूर लोटले. त्यानंतर त्यांच्या जागी कोणाची नेमणूक करायची याचे उत्तर आज पर्यंत भाजपला सुटले नाही. त्यामुळे संघटनेत काम करण्याचा तगडा अनुभव असणारे चंद्रकांत पाटीलच या पदावर बसण्यासाठी योग्य असतील असे पक्ष श्रेष्ठींना वाटल्याने त्यांना त्या पदी नेमण्याच्या निर्णयापर्यंत भाजप येऊन पोचले आहे.
भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद अशी संकल्पना आहे. मात्र चंद्रकांत पाटील या संकल्पनेला अफवाद ठरणार आहेत. कारण चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावर राहून देखील मंत्री राहणार आहेत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप संघटनेतील महत्वाच्या बाबीवर चंद्रकांत पाटील यांचा वरदहस्त राहणार आहे.