कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन करण्यासाठी कराड येथे पालिकेची परवानगी न घेता दोन ठिकाणी शुभेच्छा फलक लावल्याप्रकरणी कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर आज कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अनधिकृतपणे बेकायदा फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे पालिका वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. याबाबतची फिर्याद आरोग्य निरीक्षक मिलिंद शिवाजीराव शिंदे (वय 54, रा. शुक्रवार पेठ, कराड) यांनी दिली शहर पोलिसात दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कराड शहरात वाढदिवसाचे फ्लेक्स बोर्ड, शुभेच्छा फलक लावण्यास पालिकेकडून तसेच प्रशासनाकडून बंदी घालण्यात आलेली आहे. दि. 2 जुलै 2021 रोजी दुपारी 2.30 ते 4 च्या दरम्यान शहरातील शाहू चौक येथे रस्त्याकडेला व बनपुरकर कॉलनी शनिवार पेठ याठिकाणी “कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सहकार पॅनेलच्या निवडुन आलेल्या सर्व संचालकाचे हार्दिक अभिनंदन” असे मजकुराचे सुमारे दोन फ्लेक्स अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश आनंदराव शिंदे यांनी लावले.
उमेश शिंदे यांनी कराड नगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे लावलेचे आढळून आले. याबाबत कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी शिंदे यांना नोटीस देऊनही त्यांनी खुलासा करावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी आजअखेर खुलासा दिला नसल्याने सोमवारी उशिरा कराड शहर पोलिसात कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार संदीप पाटील करीत आहेत.