सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात राजकीय घडामोडी घडू लागलेल्या आहे. जिल्ह्यात भाजपकडून पक्षवाढीसाठी देखील प्रयत्न होत आहेत. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांकडून चांगल्या प्रकारे काम केले जात आहे का? हे पाहत आगामी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप पक्ष मजबुतीने उतरणार असल्याने त्यासाठी आखलेल्या व्यहरचनेचा आढावा घेण्यासाठी रविवारी भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सातारा येथे येऊन आमदार शिवेंद्रसिहराजे भोसले यांच्या सुरुची या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. सातारा जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आमदार शेलार यांच्याकडून आगामी निवडणुकांसाठीची रणनीती ठरविली जात आहे.
सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्या जवळ आलेल्या आहेत. या संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारकडून विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, विरोधी असलेल्या भाजपने सध्या सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले असून जिल्ह्यात पक्ष वाढीस, बूथ कमिट्या सक्षम करण्याकडे लक्ष दिले आहे.
साताऱ्यात आज आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन संघटनात्मक चर्चा केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष विक्रम पावसकर सोबत होते! pic.twitter.com/YBbelqbymC
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 11, 2021
भाजपचे दोन आमदार व दोन खासदारांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत ताकद निर्माण करण्याची तयारी सध्या पक्षातील पदाधिकाऱयांनी सुरु केली आहे. त्यानुसार भाजपने बूथनिहाय बांधणी सुरू केली आहे. सातारा जिल्हा दौऱ्यावर असलेल्या भाजप आमदार आशिष शेलार यांच्याबरोबर भाजप अध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्यासह विठ्ठल बलशेटवार, विकास गाेसावी व पदाधिकारीही आहेत.