हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : राज्यात रेंडीसीव्हरवरून राजकारण तापलं आहे. अशा परिस्थिती प्रशारकीय अधिकाऱ्यांना नागरिक, लोकप्रतिनिधींच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. रेमडीसीव्हरच्या तुटवड्यावरून सध्या भाजपचे आमदार, नेते हे महाविकास आघाडी व अधिकाऱ्यांना कोंडीत पकडत असून असाच प्रकार गुरुवारी बीड जिल्ह्यात घडला. रेमडीसिविर इंजेक्शन वरून अगोदरच वातावरण चांगलंच तापलं असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांना धारेवर धरत बैठकीतच जाब विचारला. जिल्ह्यात रेमडीसिविर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू असून जिल्हा प्रशासनाचं यावर कोणतंही नियंत्रण नाही, असा आरोप करत धस यांनी बैठकीत चांगलाच गोंधळ घातला.
बीड जिल्ह्यात तर कोरोनाचा वाढता समूहसंसर्ग उच्छाद मांडत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत असले, तरी परिस्थिती अद्याप आटोक्यात येत नाही. अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाने मृत्यू झालेल्या 8 जणांवर एकाच सरणावर अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ अंबाजोगाई नगर पालिकेवर आली. बीड जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन आणि आॅक्सिजनच्या तुटवड्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांनी काल प्रसिद्धी पत्रक काढून जिल्ह्याला आलेला रेमडेसिविरचा साठा सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी प्रशासनाने परस्पर कर्जत-जामखेडला पळवल्याचा आरोप केला होता. तर पालकमंत्री रेमडेसिविर उपलब्ध असल्याच्या बातम्या छापून मोकळे होतात, प्रत्यक्षात मात्र इंजेक्शनचा पत्ताच नाही, असा आरोप आमदार धस यांनी देखील केला होता.
https://www.facebook.com/lsambha/videos/4909583822408358
या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांनी आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या कार्यालयात धाव घेतली होती. यावेळी जिल्हाधिकार्यांसोबत सर्वानी चर्चा सुरु केली. भाजपसह सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावल्यामुळे बैठक चांगलीच वादळी ठरली. कोरोना रुग्ण मृत्यूशी झुंज देत असतांना त्यांना रेमडेसिविर मिळत नाही, तर दुसरीकडे इंजेक्शनची काळ्याबाजारात विक्री केली जाते, प्रशासनाचा यावर कुठल्याच प्रकारचा अंकुश नसल्याचा आरोप धस यांनी यावेळी केला.
भाजपचे आमदार धस यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्यावर चांगलीच प्रश्नांची सरबत्ती केली. जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ सुरू असल्याचे कळताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी तिकडे धाव घेतली. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत काही दिवसांपुर्वी झालेल्या कोरोना आढावा बैठकीत २१ एप्रिलपर्यंत रेमडेसिविरचा साठा जिल्ह्याला उपलब्ध होईल, अशी माहिती दिली होती. परंतु दोन दिवसात जिल्ह्यात एकही रेमडेसिविर इंजेक्शन आलेले नव्हते. त्यामुळे आक्रमक झालेल्या आमदार सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत संताप व्यक्त केला. जिल्हाधिकारी आणि धस यांच्यात बराच वेळ तुतूमैमै सुरू होती.