सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वणवेच वणवे; वनविभाग मात्र गाढ झोपेत

ढेबेवाडी | सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफर झोनमध्ये असणाऱ्या पांढरेपाणी आणि उंबरणे गावासह वाल्मिकी पठारावरील भागात गेल्या काही दिवसांपासून आगीचे राैद्ररूप ठिकठिकाणी पहायला मिळात आहे. या भागात वणवेच्या वणवे लागलेले पहायला मिळत असताना वनविभाग, वन्यजीव विभाग नेमका कुठे गायब झाला असा प्रश्न सामान्यांना पडत आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वणवेच वणवे लागलेले असताना वनविभाग गाढ झोपेत आहे का? असा संतप्त सवाल वन्यजीव प्रेमींकडून विचारला जात आहे. कारण जंगले जगविण्यासाठी झाडे, लावण्यासाठी वनविभागावर करोडोचा खर्च करण्यात येत असतो, मात्र त्यांचे फलित वणव्यामुळे शून्य दिसून येत आहे.

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी गावापासून 25 ते 30 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या उंबरणे गावच्या हद्दीतून पुढे पांढरेपाणी हे गाव येते. या भागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पचा बफर झोन आहे. या झोनमध्ये प्राणी तसेच मानवास नियमांचे पालन करून जाता येते. या परिसरात अस्वल, बिबट्या, गवे, ससा यासह अन्य पक्षी, प्राणी आढळून येत आहेत. व्याघ्र प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर प्राणी असल्याने झाडे यावीत, यासाठी वनविभागाकडून दरवर्षी लाखो रूपयांचा खर्च करण्यात येत असतो. मात्र उंबरणे ते पांढरेपाणी गावाच्या रस्त्यावर दोहोबाजूचे सर्व जंगल वणव्यात जळून खाक झालेले आहे. ही घटना ताजी असतानाच आज वाल्मिक पठार भागात अनेक वणवे लागल्याचे चित्र आज समोर आले. हे सर्व होत असताना वन विभाग कुठे गायब झालंय असा प्रश्न नागरिक आणि वन्यजीव प्रेमींकडून विचारला जात आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा निसर्गप्रेमीचा जिव्हाळ्याचा घटक आहे. या भागात पर्यटक वनसंपत्ती तसेच प्राणी, पक्षी पाहण्यासाठी येत असतात. या ठिकाणी वनसंपत्ती तसेच जंगल केवळ वनविभागाच्या दुर्लक्षामुळे जळून खाक होत आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वणव्याचे प्रमाण वाढले आहेत. तरीही वणवे विझविणे किंवा लावणाऱ्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. वनविभाग वनसंपत्ती जपण्यासाठी व वाढविण्यासाठी असते हे तत्व कदाचित येथील कर्मचारी विसरलेले दिसून येत आहे. वाल्मिक येथील चेक पोस्टवर कोणीही उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले.

वनसंपदा खाक

या परिसरात वनसंपदा वाढविण्यासाठी दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते. या उपक्रमासाठी लाखो रूपये शासनाकडून केले जातात. तसेच वनविभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारावरही लाखो रूपयांचा खर्च केला जातो. अशावेळी शेकडो एकर जंगलात वणवे लावले जात असताना, कर्मचारी कुठे गायब असतात. केवळ अशा कामचुकारामुळे वनसंपदा खाक होत आहे.

प्राणी, पक्षी मुत्यूमुखी

वनविभागाच्या शेकडो एकर जंगलात वणवे लावण्यामुळे वनसंपदा जळून खाक होत असते. मात्र त्याचबरोबर पक्षी, प्राण्यांनाही यांचा फटका बसतो. आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानंतर अनेक पक्षी व प्राणी मृत्यूमुखी पडत असतात. परंतु केवळ वनविभागाचा अधिकार चालत असल्याने अशा गोष्टी बाहेर येत नाही एवढेच.

झाडे लावा…झाडे जाळा

वणव्यामुळे शेकडो एकरांचा परिसर बोडका होत असून वनसंपदा नाहीशी होते. अशावेळी झाडे लावा, झाडे जाळा असे वनविभागाचे स्लोगन आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला तर वावगे वाटू नये. केवळ काम दाखविण्यासाठी वृक्षारोपण केले जाते, मात्र ते जगविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत नाही.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group