हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून अनेकवेळा टीका केली जात आहे. दरम्यान आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “महाज्योतीचे अध्यक्ष वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचे वाट्टोळे केले आहे. ओबीसी, मदत व पुर्नवसन आणि चंद्रपूरचे पालकमंत्रीपद अशी तीन-तीन पदे असूनही महाज्योतीचे पद कशाला हवंय? असा सवाल पडळकरांनी केला आहे.
भाजपचे आमदार पडळकरांनी आज माध्यमांशी संवाद साधत वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले. पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या ओबीसी भटका विमुक्त समाजायचा विचार केल्यास त्याची संख्या ही ५२ टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त वापरण्याचे राजकारण केले. मंत्री वड्डेटीवार यांच्यावर टीका करताना पडळकर म्हणाले की, वडेट्टीवार यांनी दोन वर्षात साधा फलकही महाज्योतीच्या कार्यालयाला लावता आला नव्हता. पहिले आठ महिने अधिकाऱ्यांना साध्या बुड टेकावायला खुर्च्याही दिल्या नाही.
ओबीसी समाजाबद्दल माहिती देताना पडळकर यांनी वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ओबीसी बांधवावर फक्त घोषणांचा पाऊस पाडायचे आणि प्रत्यक्षात मात्र ओबीसी भटक्या विमुक्तांच्या तोंडाला फक्त पाने पुसण्याचे काम वडेट्टीवार यांनी केले असून एवढा थापाड्या मंत्री इतिहासात झाला नसेल, अशी टीकाही पडळकरांनी यावेळी केली.