औरंगाबाद – भारतीय जनता पार्टी तर्फे विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी औरंगाबादचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच औरंगाबादमधील डॉ. भागवत कराड यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी स्थान दिले आहे. यातच आता विधान परिषदेसाठी संजय केनेकर यांनी उमेदवारी निश्चित करण्यात आल्याने शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद वर भाजपचे विशेष लक्ष असल्याचे दिसत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव महाराष्ट्र भाजपतर्फे निश्चित केले आणि तशी शिफारसही केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या अनुमतीने केंद्रीय निवडणूक समितीकडून संजय केणेकर यांची उमेदवारी लवकरच जाहीर होईल. निवडणूक अर्ज भरण्याची मुदत 16 नोव्हेंबर असून केंद्रीय समिती कडून नाव निश्चित झाल्यावर प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत संजय केनेकर लवकरच अर्ज दाखल करणार आहेत.
विधानसभा सदस्यांमार्फत होणारी ही निवडणूक भारतीय जनता पार्टी पूर्ण सामर्थ्यानिशी लढेल आणि जिंकेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर मागील 33 वर्षांपासून निष्ठेने काम केल्याने पक्षाने मोठी संधी दिली पोटनिवडणुकीची लढत कठीण आहे. मात्र महाआघाडीतील तीन पक्षांमध्ये ताळमेळ नाही. यामुळे सरकारमधील सर्व आमदार नाराज आहेत यातून हा चमत्कार करून भाजपने निवडणूक जिंकेल, असा विश्वास संजय केनेकर यांनी व्यक्त केला आहे.