हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जोरदार पाऊस पडत असून अतिवृष्टी निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका कोकणाला बसला असून रत्नागिरी , चिपळूण आणि रायगड या ठिकाणी अनेक घरे हि पाण्याखाली गेली असून लोकांचं बचावकार्य सुरु आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राज्याला ड्रायव्हर नको तर लोकांचं हित पाहणारा चांगला मुख्यमंत्री हवा आहे, अशा शब्दात राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे
विठ्ठलच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री गाडी चालवत गेले. राज्याला ड्रायव्हर नकोय. जनतेचं हित जपणारा चांगला मुख्यमंत्री राज्याला हवा आहे. गाडी चालवणारे हजारो ड्रायव्हर महाराष्ट्र शासनाकडे आहेत.असे नारायण राणे यांनी म्हंटल. उद्धव ठाकरेंना माणुसकी तरी आहे का? चेंबूर आणि भांडुपमध्ये अतिवृष्टीने घरं कोसळल्याने काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचं साधं सांत्वन करायला ते गेले नाहीत. भेटही दिली नाही, अशी टीका राणेंनी केली.
दरम्यान राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही पण कोकणच्या पूरस्थितीत केंद्र सरकार नागरिकांना हेलिकॉप्टरसह सर्व मदत करेल असं आश्वासन नारायण राणे यांनी दिलं आहे. कोकणात जी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्याविषयी आपण केंद्राशी बोललो आहे, त्यांनी मदतीचं आश्वासन दिल्याची माहिती नारायण राणे यांनी दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झाल्याची माहिती राणे यांनी दिलीय.