हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल आता हाती येत असून नारायण राणे यांचे वर्चस्व असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 पैकी 47 ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकल्याची माहिती समोर येत आहे. तर वैभववाडी, मालवण आणि कुडाळ या सर्व भागांमध्ये भाजपला मोठे यश मिळाल्याचा दावा भाजपच्या नेत्यांकडून केला जात आहे. हा शिवसेनेच्या कोकणातील वर्चस्वाला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, यावरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे.कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण केवळ माझ्यामुळे होतं. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, असे वक्तव्य नारायण राणे यांनी केले. तसेच यावेळी भाजपने शिवसेनेची ताकद असलेल्या ग्रामपंचायतींमध्येही मुसंडी मारली आहे. पुढच्यावेळेस कोकणात शिवसेना औषधालाही सापडणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
दरम्यान, राणे कुटुंबियांना धक्का देणारा अजून कोणीही जन्माला आला नाही आणि येणारही नाही. जनता आमच्याबरोबर आहे. सिंधुदुर्गात आम्हाला मोठे यश मिळेल, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’