कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा अनपेक्षित पराभव झाल्या नंतर जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते नरेंद्र पाटील यांना विचारले असता जेव्हा दुसऱ्या साठी आपण खड्डा खोदतो तेव्हा आपणही कधी ना कधी त्या खड्ड्यात पडतो असा टोला त्यांनी लगावला. माथाडी नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी आज कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी शाशिकांत शिंदे यांच्यावर शेलक्या भाषेत टिका केली.
शशिकांत शिंदे हे जरी माझे सहकारी असले तरी प्रत्यक्षात निवडणुकीत काय घडलं हे मला माहित नाही, मी त्या ठिकाणी प्रचाराला देखील गेलो नाही. पण जेव्हा दुसऱ्या साठी आपण खड्डा खोदतो तेव्हा आपणही कधी ना कधी त्या खड्ड्यात पडतो असा टोला नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांना लगावला. नरेंद्र पाटील यांनी केलेल्या टिकेमुळे दोन माथाडी नेत्यांमध्येच यापुढे वाकयुध्द सुरु होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत राष्ट्रवादीचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी जावळी सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांच्याविरोधात ज्ञानदेव राजणे हे अवघ्या एका मताने विजयी झाले. त्यानंतर सातारा जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यालय शिंदे यांच्या कार्यकर्त्यानी फोडले होते. या एकूण प्रकरणानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात येऊन शशिकांत शिंदे यांच्या सोबत बंद कमरा आड चर्चा केली.