हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदेगट आणि भाजपचे सरकार स्थापन झालं असलं तरी कट्टर शत्रू असलेले राणे आणि दीपक केसरकर यांच्यातील वाद अजूनही सुरूच आहे. त्यातच आता निलेश राणे यांच्या ट्विटने हा वाद आणखी टोकाला जाण्याची चिन्हे आहेत. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे असं निलेश राणेंनी म्हंटल.
नेमकं काय आहे प्रकरण-
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी २ दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंवरून नारायण राणेंवर टीका केली होती. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले आणि भाजप शिवसेना युतीची चर्चा फिस्कटली असा थेट दावा केसरकरांनी केला होता. मात्र त्यानंतर त्यांनी यावर सारवासारव करत इथून पुढे आपण राणेंवर काही बोलणार नाही, माझा त्यांचा वैयक्तिक वाद नाही असं म्हणत जिल्ह्याच्या विकासात त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ आली तर मी नेहमीच तयार आहे असं म्हंटल आणि हा वाद शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र यानंतर निलेश राणे यांनी केलेल्या ट्विटमुळे आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) August 7, 2022
काय आहे निलेश राणे यांचे ट्विट-
दीपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे. नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, असे ट्विट करत निलेश राणेंनी केसरकरांवर जहरी टीका केली आहे. त्यामुळे राज्यात भाजप – शिंदे गटाचे सरकार येऊनही राणे -केसरकर वाद भविष्यातही असाच सुरु राहण्याची शक्यता आहे.