हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाची मालिका अद्याप सुरूच आहे. आता मुंबईतील वाढत्या खड्ड्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर याना खरमरीत पत्र लिहिलं आहे. ‘एखादा पेंग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा त्रास कमी करा असे नितेश राणे यांनी म्हंटल आहे
नितेश राणे यांचं पत्र जसेच्या तसे-
गेल्या तीस वर्षांपासून मुंबईकरानी शिवसेनेच्या हातात बृहन्मुंबई महानगर पालिकेची एकहाती सत्ता दिली आहे. परंतु या मुंबईकरांच्या विश्वासाची परतफेड आपण कायमच रस्त्यावरच्या खड्ड्यांनी केली. मुंबईकरांच्या हक्काच्या किमान मुलभूत सुविधा तुम्ही पुरवाव्यात ही मुंबईकरांची रास्त अपेक्षा होती, परंतु अनेक मुंबईकरांना या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात आपला व आपल्या आप्तांचा जीव गमवावा लागला आहे. आज मुंबईकर वैतागुन म्हणतोय ‘एखादा पेग्विन कमी पाळा पण खड्डे बुजवून मुंबईकरांचा जीवघेणा प्रवास टाळा’.
आजपर्यंत मुंबईतील खड्ड्यांसाठी २२ हजार कोटी खर्च करूनही खड्डेमुक्त रस्ते होत नाहीत. मुंबई मनपानं सामान्यांनी आपल्या करातून दिलेला हा पैसा खड्ड्यात घातला की कॉंट्रक्टर्सच्या घशात? असा सामान्य मुंबईकरांच्या मनातला प्रश्न भाजप युवा मोर्चाचे तरूण विचारायला जातात, लोकशाही मार्गाने आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेंव्हा आमच्यावर दंडुकशाहीचा गैरवापर करून लाठी हल्ला केला जातो.”
“महानगर पालिकेतील सत्ताधारी सेना जर काँट्रॅक्टरधार्जीणे निर्णय घेत असेल व आम्ही विचारलेल्या प्रश्नांना दाद देत नसेल तर लोकशाहीने मार्गाने आयुक्तांना भेटण्याचा पुर्ण अधिकार आहे. परंतु महापालिका आयुक्तही माझ्या युवा मोर्च्याच्या सहकाऱ्यांना भेटण्याचे टाळत आहेत. याचा अर्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांवरही काँट्रॅक्टरच्या संगनमताने सत्ताधारी सेनेकडून दबाव टाकला जातोय की काय? किंवा त्यामुळेच भाजप युवा मोर्चाचे निवेदन स्वीकारण्याची महापालिका आयुक्तांना भिती वाटतेय?” असा सवाल त्यांनी केला
“सामान्य मुंबईकरांसाठी न्याय मागणाऱ्यांवर हल्ला करण्यात जी तत्परता तुम्ही दाखवली तीच तत्परता रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आपण दाखवाल, अन्यथा दिवाळीपूर्वी रस्त्यावरचे खड्डे उचलण्यात ठोस पाऊलं उचलले नाहीत तर मी आणि माझे भाजपा युवा मोर्चाचे सहकारी यांना सोबत घेऊन मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी स्वत: रस्त्यावरती उतरू”, असं नितेश राणेंनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.