हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ च्या निवडणुकीनंतर भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिले होते. मात्र हे पद मला द्यावं लागेल म्हणून तेव्हा शिवसेनेनं हे पदच नाकारलं असा मोठा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य करताना याबाबत खुलासा केला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, २०१४ निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून शिवसेना भाजपची युती तुटली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मी विरोधी पक्षनेता झालो. नंतरच्या काळात युतीसाठी प्रयत्न झाले, ते यशस्वी ठरले आणि आम्ही सरकार बनवले. त्यावेळीच भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होत मात्र सेनेनं ते नाकारलं असं शिंदेनी सांगितलं.
भिवंडीत झालेल्या एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस स्वत: मला म्हणाले होते की तुमच्याकडे नवीन जबाबदारी येणार आहे. पण मला माहिती होतं की शिवसेना हे पद घेणारच नाही. तेव्हा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं असतं, तर ते मला द्यावं लागलं असतं. त्यामुळेच ते पद तेव्हा शिवसेनेनं घेतलं नाही असं एकनाथ शिंदे म्हणाले.