हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांवर माजी ग्रामविकास मंत्री आणि धनंजय मुंडे यांच्या भगिनी पंकजा गोपिनाथ मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी औरंगाबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारण्यात आलं. त्यावेळी त्या म्हणाल्या की, तो विषय बऱ्यापैकी मागे पडला आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या, तो विषय बऱ्यापैकी मागे पडलेला आहे. तरीही याच्यावर परत परत बोलावं लागू नये म्हणून तुम्ही आलाच आहात, तर सैद्धांतिकदृष्ट्या, नैतिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या, कायदेशीरदृष्ट्या या गोष्टीचं समर्थन मी कधीही करू शकत नाही’, असं पंकजा म्हणाल्या. पण ही प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं नाही.
कुठल्याही एका गोष्टीमुळे एखाद्या कुटुंबाला किंवा कुटुंबात ज्यांचा काही दोष नाही, त्या कुटुंबातील मुलांना त्रास होतो. मी महिला बालकल्याण मंत्रीही राहिलेली आहे. मी महिला म्हणून या गोष्टीकडे संवेदनशीलतेने बघते. हा विषय कोणाचाही असता तरी त्याचं राजकीय भांडवल मी केलं नसतं आणि आताही करणार नाही. यात संवेदनशील पद्धतीनं विचार करायला हवा. ज्या काही गोष्टी आहेत, त्याचा भविष्यात निकाल लागेलच’, असंही त्या म्हणाल्या.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’