विशेष प्रतिनिधी । विदर्भात विधानसभेच्या एकूण ६२ जागा आहेत. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला ४४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजपला २५ च्या आसपास जागांवर समाधान मानावे लागणार आहे. शिवसेनेला ४ जागा मिळाल्या आहेत.भाजप-शिवसेना युतीचे सरकार सलग दुसऱ्यांदा सत्तेत येत असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिथून निवडून येतात त्या विदर्भात भाजपला हा मोठा धक्का आहे.
गेल्या वेळी काँग्रेसला फक्त ५ जागा आणि राष्ट्रवादीला केवळ १ जागा जिंकता आली होती. यावेळी काँग्रेसला १७ तर राष्ट्रवादीला ६ जागा मिळताना दिसत आहेत. गड मानल्या जाणाऱ्या भाजपला हा धक्का आहे. कृषिमंत्री भाजपा नेते डॉ. अनिल बोन्डे पराभूत झाले आहेत. तिथे मोर्शीमध्ये स्वाभिमानी पक्षाचे देवेंद्र भुयार जिंकले आहेत. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी भाजपचे डॉ. सुनील देशमुख यांना हरवले.
नागपूर जिल्ह्यातील १२ जागांपैकी ११ जागा गेल्यावेळी भाजपकडे होत्या. सुनील केदार यांच्यामुळे काँग्रेसमुक्त नागपूर जिल्हा होण्याची नामुष्की टळली होती. यावेळी १२ जागांपैकी ५ जागा जिंकून काँग्रेसने भाजपशी बरोबरी केली. पुतण्याकडून गेल्यावेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढताना राष्ट्रवादीचे देशमुख काटोलमधून पाचव्यांदा विजयी झाले आहेत. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापून भाजपने खळबळ उडवून दिली होती. तिथे कामठीमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली.