हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेला शह देण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसे यांच्या आघाडीच्या शक्यतेने जोर धरला आहे. त्यातच योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल अस सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
राज ठाकरे यांनी पक्ष म्हणून व्यापक आणि सर्वसमावेशक भूमिका घ्यावी. आमच्या वरिष्ठ नेत्यांनीही हे मत अनेकदा व्यक्त केलं आहे. मनसेनं परप्रांतीयांबाबतची संकुचित भूमिका सोडून द्यावी. तसंच, भाजपची हिंदुत्वाची भूमिकाही मनसेला मान्य असणं गरजेचं आहे, असं आमच्या नेत्यांनी यापूर्वीच सांगितलंय. असे दरेकरांनी म्हंटल आहे.
दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मात देण्यासाठी भाजपनं जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच मनसेची साथ मिळाल्यास भाजपच्या ”मिशन मुंबई’ला मोठं बळ मिळू शकतं, असा एक अंदाज आहे. त्यामुळंही मनसे-भाजप युतीची जोरदार चर्चा सुरू आहे.