हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 100 कोटींच्या वसुली प्रकरणावरुन अडचणीत असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 4 कोटी 20 लाख मालमत्तेवर ईडीने जप्ती आणल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकार वर हल्लाबोल केला आहे. राजकीय सूडाचा आरोप करणाऱ्यांना ही चपराक आहे अशा शब्दांत दरेकरांनी निशाणा साधला.
अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता आरोप करणाऱ्यांचं समाधान होईल, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत. “राजकीय सूडापोटी केंद्र सरकार आणि एजन्सी काम करतायत असं बोलणाऱ्यांना ही चपराक आहे. जर तपासात मालमत्ता जप्त झाली, याचा अर्थ त्या तपासात तथ्य आहे. अशा कोणत्याही यंत्रणेला मनमानी करता येत नाही. आता भारतीय जनता पक्षावर आणि केंद्रावर आणि तपास यंत्रणांवर आरोप करणाऱ्यांचं समाधान होईल. आता या प्रकरणात सत्यता असल्याचं दिसून आलं आहे. भविष्यात यातील तथ्य आणि सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाहीत”, असं प्रविण दरेकर यांनी म्हंटल
राजकीय सूडापोटी कारवाई होत असल्याचा आरोप करणाऱ्यांचे कदाचित आता समाधान होईल, कारण माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या केसमध्ये तथ्य असल्याचे पुरावे दिसून येत आहेत!@BJP4Maharashtra pic.twitter.com/kzQmSk0IMF
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 16, 2021
अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ-
ईडी च्या रडारावर असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचा गंभीर आरोप होता. या अनिल देशमुख यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुखांची ४ कोटी २० लाखांची संपत्ती ईडी कडून जप्त करण्यात आली आहे.
अनिल देशमुख यांना आत्तापर्यंत तीन वेळा ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यांच्या दोन्ही स्वीय साहाय्यकांना अटक करण्यात आली असून अनिल देशमुख यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील अशाच प्रकारचे चौकशीसाठीचे समन्स बजावण्यात आले आहेत.