लोणंद | मलकापूर नगरपालिकेला जेवढे पैसे मिळाले, तेवढा निधी जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेला मिळाला नाही. त्याच पध्दतीने लोणंद शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसला एकहाती सत्ता द्यावी. आगामी निवडणुकीत ज्यांना कोणाला काँग्रेसबरोबर यायचे आहे, त्यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढावे. काहीही झाले तरी भाजपला रोखायचे आहे. त्यासाठी कोणाशीही स्थानिक आघाडी केली जाणार नाही, अशी भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केली.
लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील राधेशाम पॅलेस मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र डोईफोडे, खंडाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्फराज बागवान, खंडाळा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शैलजा खरात, दादासाहेब शेळके – पाटील, सोपानराव क्षीरसागर, दत्तात्रय खरात, म्हस्कूअण्णा शेळके-पाटील, अॅड. हेमंत खरात, रमेश कर्नवर, अॅड. बबलूभाई मणेर, इम्रान बागवान, प्रवीण डोईफोडे,इकबाल बागवान आदी प्रमुख उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्व. अॅड. बाळासाहेब बागवान यांच्याशिवाय नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. लोणंदला सर्वच्या सर्व 17 जागांवर ताकदीचे, सुशिक्षित, तसेच जनमानसात चांगले स्थान असणारे उमेदवार द्या. (कै.) अॅड. बाळासाहेब बागवान यांनी लोणंदनगरीचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेऊन काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत.” सर्फराज बागवान, दादासाहेब शेळके-पाटील, निसार आतार, म्हस्कूअण्णा शेळके- पाटील यांचीही भाषणे झाली. तारिक बागवान यांनी सूत्रसंचालन केले.