हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. एकीकडे सत्ताधारी आपल्या सरकारचे गोडवे गात असताना दुसरीकडे विरोधक मात्र सरकारच्या 2 वर्षाच्या कामगिरी वरून टीका करत आहेत. याच दरम्यान ठाकरे सरकारची दोन वर्षे म्हणजे राक्षसी सत्ता असल्याचा घणाघाती आरोप भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकारची दोन वर्षे ही राक्षसी सत्तेची आहेत. महाराष्ट्रासाठी कोणतीही कामगिरी न करता वसुली, भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार करत व्यसनाधीनांसाठी पायघड्या टाकून हे सरकार सत्तेवर आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय साधू-संत-वारकरी यांच्यावर सातत्याने अन्याय करणाऱ्या ‘राक्षसी’ सत्तेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या सत्तेतून पांडुरंगा,महाराष्ट्राला लवकर मुक्त कर, अशी विनवणी ही भोसले यांनी आपल्या ट्वीटमधून केलेली आहे.
दोन वर्षे राक्षसी सत्तेची…….
पांडुरंगा , महाराष्ट्राला या राक्षसी सत्तेपासून लवकर मुक्त कर !@Dev_Fadnavis @ChDadaPatil @ChDadaPatil pic.twitter.com/bANbf4w8A1
— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) November 28, 2021
दरम्यान, तुषार भोसले यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर त्यांच्या आजारपणावरून वादग्रस्त टीका केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याविरोधात आक्रमक झाली होती. याबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा नाशिक शहरात फिरू देणार नाही, असा इशाराही देण्यात आला होता.