सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
मोदी या आडनावावरून टीका करताना ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीने आज राज्यभर आंदोलन केले. साताऱ्यात जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार पोवई नाका या ठिकाणी सातारा शहर, सातारा ग्रामीण, जावळी आणि कोरेगाव मंडलातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केले.
सातारा येथे भाजप कार्यकर्त्याच्यावतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळीआ काही भाजप कार्यकर्त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडून देशातील अनेक नेत्यांचा अपमान केला जात आहे. आपण ज्यांना देव मानतो त्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचाही ते वारंवार अपमान करत आहेत. नुकताच त्यांनी तेली समाजाचा म्हणजे ओबीसी समाजाचा अपमान केला आहे. आपली न्यायव्यवस्था इतकी प्रगल्भ आहे कि या न्यायव्यवस्थेने त्यांना दोन वर्षाची शिक्षा केलेली आहे. हा त्यांना चांगला धडा मिळालेला आहे. यापूर्वी दोन ते तीनवेळेला मापी मागून त्यांना सुटका झाली होती. परंतु यावेळेस त्यांनी माफी मागितली नसल्याने त्यांना शिक्षा झाली आहे.
ओबीसी समाजाचा अपमान होईल असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे,आणि त्या प्रमाणे न्याय पालिकेने राहुल गांधींच्या विरोधात निकाल देऊन त्यांना शिक्षा दिली, आता इतर जण कोणत्याही आडनाव, जाती बद्दल बोलताना शुद्धीवर राहावे, आणि भा ज पा च्या नेत्यांबद्दल काही आक्षेपार्ह विधाने केली तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी दिला.
Satara News : साताऱ्यात राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे 'जोडे मारो' आंदोलन pic.twitter.com/6o7QgY1dfm
— santosh gurav (@santosh29590931) March 25, 2023
वारंवार अशी बेताल वक्तव्य राहुल गांधी यांच्याकडून होत असल्याचा आरोप करत यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची प्रतिमा पायाखाली तुडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच आंदोलकाना रोखले. या आंदोलनात सातारा जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सातारा ग्रामीण प्रभारी गणेश पालखे, कोरेगाव तालुका अध्यक्ष संतोष जाधव आबा,जावली तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, जिल्हा कोषाध्यक्ष किशोर गोडबोले, चिटणीस सुनील जाधव, सरचिटणीस प्रवीण शहाणे, विक्रांत भोसले आदींची उपस्थिती होती.




