त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपची आघाडी तर मेघालयात त्रिशंकू?

Northeast Election Results 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ईशान्य भारतातील 3 महत्त्वाची राज्ये असलेल्या त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष्य लागले आहे. आज सकाळीच या तिन्ही राज्यातील मतमोजणीला सुरुवात झाली असून आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, नागालँड आणि त्रिपुरा मध्ये भाजपला अच्छे दिन आले असून मेघालयात मात्र त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

या तिन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा असून बहुमतासाठी ३१ जागा जिंकण्याची आवश्यकता आहे. यामधील त्रिपुरामध्ये ६० पैकी भाजप ३९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आणि डावे १५ जागांवर आघाडीवर आहेत. तर टिपरा मोथा आत्तापर्यंत ६ जागांवर आघाडीवर दाखवत आहे. त्यामुळे याठिकाणी भाजप आघाडीला स्पष्ट बहुमत मिळत मिळवत आपली सत्ता राखण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.

नागालँड मधेही भाजपला अच्छे दिन पाहायला मिळत आहे. याठिकाणी भाजप – NDPP युतीला तब्बल ५० जागांची आघाडी मिळाली आहे. एकूण ६० विधानसभा जागांपैकी भाजप NDPP युती ५०,NPF ६ तर काँग्रेस अवघ्या १ जागेवर आघाडीवर आहे. त्याठिकाणच्या निवडणुकीत भाजपने 60 पैकी 20 जागा लढवल्या होत्या तर 40 जागांवर NDPP उमेदवारांना पाठिंबा दिला होता.

मेघालय मध्ये मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल असं वाटत नाही. याठिकाणी आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने दमदार कामगिरी केली आहे. मेघालयात टीएमसी 20 जागांवर आघाडीवर आहे, एनपीपी 12 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर 16 जागांवर आघाडीवर आहेत. भाजप ५ जागांवर तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे. तिन्ही राज्यातील एकूण कल पाहता काँग्रेसचा तिन्ही ठिकाणी सुफडा साफ झाल्याचे दिसत आहे.