सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील मायणी येथील मृत व्यक्तीची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे आ. गोरेंना हा मोठा झटका न्यायालयाने दिल्याने आता अटक होणार का याकडे लक्ष लागून आहे.
माण तालुक्यातील मायणी येथील मृत भिसे यांची बोगस कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे, दत्तात्रय कोंडिबा घुटुगडे, महेश पोपट बोराटे आणि अज्ञात दोघांवर दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत महादेव पिराजी भिसे यांनी तक्रार दिली होती.
या तक्रारीवर आज वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून आज यावर सुनावणी दिली. यामध्ये जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाने फेटाळला आहे. आजच्या निर्णयामुळे आ. जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. यापूर्वी या गुन्ह्यामध्ये संजय काटकर याला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.