सातारा | रेशनिंगचे धान्य काळ्या बाजाराने खरेदी करणाऱ्या सातारा तालुक्यातील चिंचणी येथील व्यापाऱ्याला मेढा पोलिसांनी पाठलाग करत पकडले. व्यापाऱ्यांकडून सहा लाख तेराशे रुपयांच्या धान्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, स्वस्त धान्य दुकानदार दिलीप दिनकर महामुलकर (रा. करंदोशी, ता. जावळी) व माल विकत घेणारे विपुल महादेव केंजळे व नितीन सूर्यकांत गोळे (रा. चिंचणी, ता. सातारा) अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिकअप जीप व काळ्या बाजाराने विकत घेतलेले दहा पोती धान्यही पोलिसांनी जप्त केले आहे.
जावळी तालुका पुरवठा विभाग अधिकारी हणमंत धुमाळ यांनी या प्रकरणी मेढा पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल दिली असून, जप्त मुद्देमालाचा पंचनामा केला आहे. मेढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने यांनी सदर गाडीचा पाठलाग केला. धान्याची गाडी कुडाळ येथे पकडली व गाडीची पूर्णपणे तपासणी केली. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल माने करत आहेत.