खुन की आत्महत्या? कामगाराचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ 

MIDC waluj police station
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

औरंगाबाद – वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मंगलमूर्ती कॉलनीत राहत्या घरात एका 34 वर्षीय परप्रांतीय कामगाराचा संशयास्पद व अर्धनग्न अवस्थेत मृतदेह गुरुवारी दुपारी आढळून आला. अंगावरील जखमा, घटनास्थळी पडलेले रक्त व उघडा असलेला दरवाजा यावरून हा खून असल्याचे दिसून येते. या घटनेमुळे वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली असून त्याचा खून करण्यात आला की, त्याने आत्महत्या केली. या संभ्रमात वाळूज एमआयडीसी पोलिस सापडले आहे.

 

वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील मंगलमूर्ती कॉलनीमधील नाजीम रज्जाक सय्यद यांच्या तीन मजली इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावरील एका खोलीत टुनटुनकुमार रमाकांत ठाकूर (रा. बाभंगगामा, ता.बिहपूर जि. बागलपूर, बिहार) हा परप्रांतीय कामगार लॉकडाऊनपासून एकटाच राहत होता. त्याच्या शेजारी राहणारे दानिश शेख व माजीद अजहर हे धुळे येथून गुरूवारी दुपारी घरी आले असता टुनटुनकुमार याचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. त्यांनी आत डोकावून पाहिले असता त्यांना टुनटुनकुमार हा बेशुध्द अवस्थेत दिसला. त्याच्या आंगावर अनेक प्रकाराचे लहान मोठ्या जखमा दिसल्या. तसेच घटनास्थळी रक्तही पडलेले होते. शिवाय त्याच्या तोंडाला फेस आला होता.

 

ही माहिती त्यांनी घर मालकाला दिली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस निरीक्षक श्यामकांत पाटील यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत, गौतम वावळे, राजेंद्र बांगर, पोलीस अंमलदार अविनाश ढगे, दशरथ खोसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान गुन्हे शाखेचे रावसाहेब जोंधळे, राजू साळुंके, रमाकांत पठारे तसेच स्वान पथक व ठस्से तज्ज्ञ यांनीही घटनास्थळीची पाहणी करून माग शोधण्याचा प्रत्यन केला. मृताच्या अंगावरील जखमा, घटनास्थळी पडलेले रक्त व उघडा असलेला दरवाजा. यावरून संशय निर्माण होऊन हा प्रत्यक्षदर्शी खून असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा नेमका खून की आत्महत्या याबाबत पोलीस संभ्रमात सापडले आहेत. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हा खून आहे की, आत्महत्या हे स्पष्ट होणार आहे़.