औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून येत्या 1 मे रोजी औरंगाबादमध्ये भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अद्याप पोलिसांनी सभेसाठी परवानगी दिलेली नाही. तसेच, जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यातच आता मनसेला आणखी एक धक्का बसलाय. औरंगाबाद मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
आधीच पोलिसांकडून मनसेला सभेसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यात जमावबंदी लागू झाल्यामुळे मनसेसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. या सर्वात औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले सुहास दशरथे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यामुळे मनसेच्या सभेवर मोठा परिणाम पडणार आहे. यातच आता सुहास दशरथे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. सुहास दशरथे हे औरंगाबाद जिल्ह्यातील मनसेचे मोठे नाव होते. त्यांच्या नेतृत्वात मनसेने जिल्ह्यात मोठी लोकप्रियता मिळवली होती.
पण, पक्षांतर्गत कारणांमुळे चार महिन्यांपूर्वी त्यांची जिल्हाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांच्या जागी सुमित खांबेकर यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले. तेव्हापासूनच दशरथे पक्षावर नाराज होते. तसेच, ते इतर पक्षांच्या संपर्कातही होते. आता अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेस करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मनसेला औरंगाबादेतील मोठा झटका मानला जात आहे.