जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त; 24 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर

सोलापूर | ग्रामीण भागातील सर्वात महत्वाच्या अर्थकारणाचा घटक असलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. दूध संकलनात झालेली घट, कामकाजातील अनियमितता आणि बिघडलेली आर्थिक शिस्त आदी बाबींवर ठपका ठेवून पुणे विभागाचे दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांनी जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (दूध पंढरी) संचालक मंडळ बरखास्त केले आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनंतर आता सर्वात मोठी असलेल्या सहकारी संस्थेला शासनाने दणका दिला आहे.

दूध संघावर आता प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षपदी विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदस्य म्हणून सहायक निबंधक आबासाहेब गावडे, सहकार अधिकारी सुनील शिंदे यांची नियुक्ती झाली असून या दूध संघाचा कारभार या तिन्ही सदस्यांकडे असणार आहे.

दूध संघावर 24 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर असल्याचे आव्हान प्रशासक मंडळासमोर आहे. या संचालक मंडळाचे माजी आमदार दिलीप माने हे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्याच बरोबर या दूध संगाच्या संचालक मंडळात आमदार संजय शिंदे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक असे दिग्गज नेतेमंडळी आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.