कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे कोरोना रुग्णांसह इतर रुग्णांवर उपचार करणार्या बोगस डॉक्टर महिलेला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रेठरे खुर्द, ता. कराड) असे संबंधित बोगस डॉक्टर महिलेचे नाव आहे. सदरील महिला बोगस डाॅक्टर असल्याने ताब्यात घेतले असता तिने नर्स असल्याचे सांगितले होते, मात्र तिच्याकडेच कोणतेच प्रमाणपत्र नाही. त्यामुळे बोगस डाॅक्टर आता बोगस नर्सही असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, काले विभागात कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली. तर कोरोना मृत्यूदरही वाढत असताना जीव वाचविण्यासाठी रुग्णालये अपुरी पडत आहेत. अशावेळी अनेक रुग्ण नारायणवाडी येथील पंत क्लिनिक येथे उपचार घेत असल्याची माहिती काले प्राथमिक आरोग्य केद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. यादव यांना मिळाली. त्यानंतर डॉ. यादव यांना पंत क्लिनिकबाबत शंका आली. त्यामुळे त्यांनी या दवाखान्याची संपूर्ण माहिती घेतली असता चुकीची माहिती समोर आली.
दरम्यान, बुधवारी पंत क्लिनिक सुरु असल्याचे समजताच डॉ. यादव यांनी याबाबतची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिस व वैद्यकीय अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने पंत क्लिनिक येथे अचानक छापा टाकला. त्यावेळी तेथे महिला रुग्णांवर उपचार करत असल्याचे त्यांना आढळून आले. पोलिसांनी संबंधित बोगस डॉक्टर महिलेला ताब्यात घेऊन अटक केली. गुरूवारी तिला न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याचे पोलिस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी सांगितले. अधिक तपास पोलिस करत आहेत.