कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्टरला ताब्यात घेतल्यानंतर चाैकशीत मूळमालक असणाऱ्या बोगस डाॅक्टरचा पोलिसांनी शुक्रवारी रात्री पर्दापाश केला आहे. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय -२६, रा. रेठरे खुर्द, ता. कराड) असे बोगस डाॅक्टरचे नाव असून त्याला आज न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नारायणवाडी येथे सुवर्णा प्रताप मोहिते (वय 40, रेठरे खुर्द, ता. कराड) असे पोलिस कोठडीत असलेल्या बोगस डॉक्टर महिलेचे नाव आहे. सदरील महिलेकडे पोलिसांनी चाैकशी केली असता सुदर्शन जाधव हा काही वर्षापासून नारायणवाडी येथील पंत क्लिनिकचा मालक असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता तो डाॅक्टर नसून फार्मासिस्ट असल्याचे समोर आले आहे.
सहायक पोलिस निरीक्षक रेखा दुधभाते यांनी पोलिस टीमच्या सहाय्याने ही कारवाई केली होती. आता सुदर्शन जाधव याला दोन दिवस पोलिस कोठडी मिळाली असून चाैकशी सुरू आहे. तसेच पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दुधभाते या करित आहेत.