हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने कहर केला आहे. अश्या काळात अभिनेता सोनू सूद लोकांसाठी देवदूत बनला. त्याने अगदी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांच्या हाकेला धाव घेतली. त्यामुळे त्याचे काम पाहून सध्या जो तो त्याला पंतप्रधान बनवण्याची मागणी करतोय. नुकतीच राखी सावंतने सोनू पंतप्रधान व्हायला हवा, अशी इच्छा व्यक्त केली होती. तर त्याआधी अभिनेता वीर दास यानेही सोनूला पंतप्रधान बनवायला हवा, असे म्हटले होते. अगदी सोशल मीडियावरही अनेक लोकांनी त्याला पंतप्रधान बनवा, अशी इच्छा व्यक्त केली आहे. यावर अखेर सोनूने प्रतिक्रिया दिली. जो जिथे आहे तेच योग्य आहे, सामान्य माणूस म्हणूनच चांगला आहे.. तुमच्यासोबत तरी उभा आहे असे म्हणत सोनुने पुन्हा एकदा साऱ्यांच्या काळजाला हात घातला आहे.
https://www.instagram.com/tv/COupc8mBUGR/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेता सोनू सूदच्या या प्रतिक्रियेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत सोनू सूद त्याच्या घराबाहेर उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सला ज्यूसचे वाटप करताना दिसतोय. यादरम्यान त्यातील एका सेलिब्रिटी फोटोग्राफरने सोनूला पंतप्रधान होणार का? अशी विचारणा केली. तर अन्य एकाने सोनूजी, सगळे तुम्हाला पंतप्रधान म्हणून पाहू इच्छितात? तुम्ही निवडणूक लढणार का? असा प्रश्न त्याला केला. यावर सोनूने अगदी सौम्य भाषेत आणि नम्रपणे उत्तर दिले. ‘जो जहां वहीं सही है, आम इंसान ही बेहतर हूं. आप लोगों के साथ तो खडा हूं…,’ असे तो बोलताना या व्हिडिओत दिसतोय.
https://www.instagram.com/p/CODd5qEgZD6/?utm_source=ig_web_copy_link
कोरोनाच्या या भयंकर महामारीच्या काळात सोनू सूद सरळ रस्त्यावर उतरून लोकांना मदत करतोय. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा त्याने हजारो स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरी त्यांच्या प्रियजनांकडे सुखरूप पोहोचवले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली. ती लाट ओसरली मात्र या लाटेतही त्याच्या मदतीचा ओघ तितक्याच जोमाने सुरु राहिला. लोकांना रोजगार देण्यापासून तर त्यांच्या शिक्षणाचा भार उचलण्यापर्यंत, उपचारासाठी मदत करण्यापर्यंत अनेक गोष्टी त्याने केल्या. कोरोनाच्या दुस-या लाटेदरम्यान सोनू लोकांसाठी दिवसरात्र कार्यरत आहे. देशात ऑक्सिजन, आयसीयू बेड्सचा प्रचंड तुटवडा आहे. यामुळे लवकरच चार ऑक्सिजन प्लान्ट लावण्याचा त्याचा मानस आहे. कोरोनाकाळात ऑक्सिजनचा तुटवडा सहन करत असणा-या चार राज्यांत हे प्लान्ट उभारले जाणार आहेत. यात महाराष्ट्रासह दिल्लीचादेखील समावेश आहे.