इरफान खानच्या निधनाने बॉलीवूडकर हळहळले, वाचा कोण काय म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । दमदार अभिनेता इरफान खान निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांना इरफानच्या अकाली जाण्याने धक्का बसला आहे. इरफानच्या निधनावर अनेक आघाडीच्या स्टार्स आणि दिग्दर्शकांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. इरफानचा जवळचा मित्र आणि त्याच्यासोबत काम केलेल्या दिग्दर्शक सुजीत सरकारने सर्वात आधी ट्विट करून इरफान खानच्या निधनाची माहिती दिली. सुजीत सरकार यांनी लिहिले की, ”माझा प्रिय मित्र इरफान… तू लढत राहिलास…लढत राहिलास आणि लढत राहिलास. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत राहील आणि आपण पुन्हा भेटू… श्रद्धांजली.”

सेलिब्रिटी दिग्दर्शक करण जोहरने ट्विट केले की, ”धन्यवाद, इतक्या चांगल्या सिनेमांसाठी. कलाकारांची व्याप्ती वाढविण्यासाठी आभारी आहे. आपल्या सिनेमांना उंचीवर नेऊन ठेवला त्यासाठी आभारी आहे. आम्हाला नेहमी तुझी आठवण येईल. तुझे अस्तित्व आमच्या जीवनात नेहमी राहिल. संपूर्ण सिनेइंडस्ट्री तुम्हाला सलाम करतो.”

इरफान सोबत काम केलेल्या खिलाडी अक्षय कुमारने ट्विट केले की, ”खूप वाईट बातमी आहे. अचानक इरफान खानच्या निधनाचे वृत्त ऐकले. आमच्या काळातील सर्वाेत्तम कलाकारांपैकी एक होता. त्याच्या कुटुंबाला या कठीण काळात सामोरे जाण्यासाठी ताकद देवो.”

जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विटरवर लिहिले की, ”सकाळीच इरफान खानच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. खूप लवकर गेला. खूप पॉवरफुल अभिनेता आणि कशी कर्करोगावर शौर्याने मात केली होती. हे खूप मोठे नुकसान आहे फक्त त्याच्या कुटुंबाचे नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीचे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो”

इरफानप्रमाणेच हॉलीवूडमध्ये नाव कमावलेल्या प्रियंका चोप्राने ट्विट केले की,”तुम्ही जे काही केले ते जादूसारखे होते. तुमचे कौशल्य अनेकांना मार्ग दाखवले आहेत आणि कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तुम्हाला खूप मिस करेन. कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.”

तर अभिनेत्री अनुष्का शर्माने लिहिले की, ”हृदयावर दगड ठेवून मी हे ट्विट करत आहे. अद्भूतपूर्व कलाकार, त्यांच्या परफॉर्मन्स माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला पण खेद म्हणजे आज ते आपल्याला सोडून गेले. आरआयपी इरफान खान. ओम शांती.”

अभिनेत्री सोनम कपूरने ट्विट केले की, ”आत्म्यास शांती लाभो. तुमचा दयाळूपणा माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता जेव्हा माझ्यात आत्मविश्वास नव्हता. तुमच्या कुटुंबियासोबत व जवळच्या व्यक्तींच्या दुःखात सहभागी आहे.”

भूमी पेडणेकरने ट्विट केले की, ”इरफान खान सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि दुःखही वाटले. कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. तुम्ही आमच्या मनात नेहमी जीवंत राहणार आहात. आमचे मनोरंजन केले आणि इतके चांगले परफॉर्मन्स दिले, त्यासाठी आभारी आहे. तुम्ही आमच्यासाठी अभिनयाची शाळा आहात आणि नेहमीच प्रेरणादायी आहात. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment