हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण दिले जावे, अशी मागणी मराठा समाजबांधवांकडून केली जात आहे. आता तर आरक्षणाच्या मुद्यांवरून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती हेही एकत्र आले आहे. त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्याचा इशाराही सोमवारी दिला आहे. या राजेंच्या एकत्रित येण्याबाबत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मत व्यक्त केले आहे. “या दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणासाठी दिल्ली व राज्य सरकारला वाकवून दबाव आणावा,” अशी विनंती पाटील यांनी केली आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी याचिकेद्वारे आरक्षणाचा प्रश्न मांडला आहे. सोमवारी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व कोल्हापूरचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणप्रश्नी मत व्यक्त केल्यानंतर याबाबत याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी माहिती दिली. पाटील यांनी आरक्षणप्रश्नी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, ” मराठा समाजबांधवांना आरक्षण मिळाले पाहिजे. आरक्षणप्रश्नी खासदार उदयनराजे भोसले व खासदार संभाजीराजे छत्रपती हे एकत्रित आले आहेत. या दोन्ही राजेंकडून आता आरक्षणाची लढाई पुढे नेली जाणार आहे. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाच्या लढाईचे नेतृत्व करीत दिल्ली व राज्य सरकारवर दबाव आणावा. त्यांनी आरक्षणप्रश्नी पर्यायी व्यवस्था करून द्यावी. जेणेकरून आरक्षण लवकर मिळेल, अशी अपेक्षा याचिकाकर्ते पाटील यांनी व्यक्त केली.