एकनाथ खडसेंनी ‘ते’ वक्तव्य मागे घ्यावे, अन्यथा…. ; ब्राह्मण महासंघाचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंच्या वादग्रस्त विधानावरून ब्राह्मण समाजाने आक्रमक भूमिका घेतली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना एकनाथ खडसेंनी मी मुख्यमंत्रिपद ब्राह्मणाला दान केले असं विधान केले होते, त्यावरून पुण्यातील ब्राह्मण महासंघाने खडसेंच्या विधानावर आक्षेप घेत त्यांनी तातडीने माफी मागावी असं म्हटलं आहे.

ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, एकनाथ खडसेंनी फडणवीसांवर टीका करताना ब्राह्मण समाजाबाबत जे वक्तव्य केले ते त्यांनी मागे घ्यावं, अन्यथा पुण्यात खडसेंचा एकही कार्यक्रम होऊ देणार नाही, त्यांच्या वक्तव्याचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर निवडणुकीत भोगावे लागतील असंही दवेंनी म्हटलं आहे.

दान देण्यासाठी मुळात ती वस्तू आपल्या अधिकारात असायला हवी. याचे ज्ञान खडसे यांना नसावे याचे आश्चर्य वाटतं. खडसे यांनी आपले विधान त्वरित मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा पुण्यात आल्यानंतर त्यांना याचा जाब विचारण्यात येईल, असे आनंद दवे यांनी म्हटले होते. यासंदर्भात आज ब्राह्मण महासंघाकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील आमदारांना निवेदनही देण्यात येणार आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होती. “मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिलं”, असं खडसे म्हणाले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment