औरंगाबाद – रामेश्वरम ते ओखा साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसच्या सगळ्यात शेवटी असलेल्या बोगीचे ब्रेकलाईनर जाम झाले. मात्र यामुळे निघणाऱ्या धुरामुळे आगीच्या भीतीने रेल्वे प्रशासनाची एकच तारांबळ उडाली.
रामेश्वरम ते ओखा एक्सप्रेस औरंगाबादहुन 10:30 वाजता रवाना झाली. ही रेल्वे ताशी 100 कि. मी. च्या वेगाने धावत होती. पोटूळ ते लासूर स्टेशनदरम्यान राहणारे रेल्वे सेना सदस्य महेंद्र कुकलारे यांनी सहज लक्षात आले की मागील दोन डब्यातुन मोठ्या प्रमाणात धूर निघत आहे. ही माहिती त्यांनज तात्काळ रेल्वे सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांना दिली. सोमाणी यानी ही माहिती तात्काळ औरंगाबाद स्टेशन व्यवस्थापक एल. के. जाखडे, लासूर स्टेशन मास्तर राजेश गुप्ता, नांदेड रेल्वे नियंत्रण कक्ष प्रमुख, रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला दिली.
लासूर स्टेशनवर रामेश्वरम -ओखा सुपरफास्ट एक्सप्रेस मेन लाईनवर थांबविण्यासाठीच्या सूचना लासूर स्टेशन मास्तर यांना मिळाली. त्यामुळे एक्सप्रेस थांबविण्यात येऊन 10 मिनिटात ब्रेक मोकळे करण्यात येऊन रेल्वे पुढील प्रवासासाठी निघून गेली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडली नाही.