गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक
नक्षल्यांच्या शहीद सप्ताहादरम्यान आज दुपारी पोटेगाव पोलिस मदत केंद्रांतर्गत गरंजी गावानजीकच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जुलैपासून नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरु झाला आहे. या सप्ताहात नक्षल्यांच्या हिंसक कारवाया होऊ नये म्हणून सर्वत्र नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. असेच अभियान पोलिस व सी-६० पथकाचे जवान राबवीत असताना आज दुपारी गरंज गावानजीकच्या जंगलात नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी घनदाट जंगलात पळून गेले.
घटनास्थळाची पाहणी केली असता पोलिसांना एका महिला नक्षलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी तो मृतदेह, तसेच एक १२ बोअरची बंदूक, १३ पिट्टू व अन्य साहित्य ताब्यात घेतले आहे. घटनास्थळ परिसरात अजूनही अभियान सुरुच आहे.