पंतप्रधान मोदींचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विश्वास नाही काय?, नसेल तर त्यांना हटवा – काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विश्वास नाही का, नसेल तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पदावरून हटवा, अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. चव्हाण म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यामध्ये १३ बैठका झाल्या पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना यापैकी कोणत्याही बैठकीला बोलावले नाही. याचा अर्थ पंतप्रधान मोदींचा निर्मला सीतारामन यांच्यावर विश्वास नाही, पंतप्रधानांचा खरच निर्मला सीतारामन यांच्यावर विश्वास नसेल तर त्यांना पदावरून हटवा अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी १० जानेवारी रोजी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आणि रोजगाराबरोबरच प्रगतीसाठी महत्वाची बैठक घेतली. पंतप्रधान मोदींची सुमारे 30 उद्योग तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञांशी दोन तास बैठक घेतली. मोदींनी अर्थशास्त्रज्ञांसमोर पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले. पंतप्रधानांनी उपभोग आणि मागणी वाढविण्यासाठी सूचना घेतल्या. या महत्वपूर्ण बैठकिला गृहमंत्री अमित शहा, वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. पण अर्थमंत्री निर्मला सीतारामनच उपस्थित नव्हत्या. आर्थिक विषयांच्या महत्वपूर्ण बैठकीला निर्मला सीतारामन हजर नसल्यामुळे काँग्रेसने या मुद्यावरून मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. आता तोच धागा पकडत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पकडत निर्मला सीतारामन तसेच मोदी सरकारला लक्ष्य केले आहे.