परभणी प्रतिनिधी | गळ्यातील दोरीला झटके देऊन त्रास देणार्या एका मुलाचा उंटाने चिडून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार परभणी येथे घडला आहे. मुलाच्या त्रासाला कंटाळून उंटाने चिडून त्याच्या मानेचा चावा घेतल्याने मुलाचा मृत्यु झाल्याचे समोर आले आहे.
हाती आलेल्या माहीतीनुसार, परभणी येथे ‘सय्यद शाह तुराबूल हक रहे’ दर्ग्याचा उर्स सुरु आहे. उर्स मधे मिरवणूक निघते. या मिरवणुकीत उंट आणि घोडे असतात. मिरवणुकीत समीर इनामदार (१५ वर्ष) हा मुलगा मिरवणुकीत एका उंटाच्या गळ्यातल्या दोरीला झटके देऊन त्याला त्रास देत होता. समीरने १५ – २० वेळा असा त्रास दिल्यामुळे चिडलेला उंट समीरच्या मानेवर चावला. उंटाने समीरची मान तोंडात धरून ठेवली. लोकांनी समीरची मान उंटाच्या तोंडातून सोडवली आणि त्याला दवाखान्यात नेले. पण रस्त्यातच समीरचा मृत्यू झाला.
या प्रकरणी समीरच्या आई वडिलांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली असून नानल पेठ पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली व उंट, उंटाचा मालक विलास खरात यांना ताब्यात घेतले आहे.