सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात ब्रम्हनळी गावात बोट उलटल्याने १४ लोक ठार झाले असून अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्या लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता बोटीत बसणाऱ्याला कोण थांबवणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ब्रम्हनळी गावची स्वतःची एक बोट होती.गावात पाणी वाढू लागल्याने त्या गावातील लोकांनी बोट काढून लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्या बोटीमध्ये बसण्यासाठी लोकांची लगबग उडाली. बोट पाण्यात जात असताना एक झाडाची तुटलेली फांदी आडवी आली आणि ही दुर्घटना घडली अशी माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. कोणाच्याही जीवाला धोका पोचू दिला जाणार नाही. नियोजित वेळेत पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम पूर्ण केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.