मुंबई प्रतिनिधी | नीलम गोऱ्हे यांचा मंत्री मंडळात समावेश कधी होणार या प्रश्नाचे उत्तर मागील पाच वर्षात मिळाले नाही. मात्र त्यांची आता विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवड करण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे या पदावर जाणाऱ्या पहिल्या महिला देखील ठरल्या आहेत. तसेच त्यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे. दिवाकर रावते त्यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला तर त्या प्रस्तावाला सुभाष देसाई, महादेव जानकर यांनी अनोमोदन दिले.
काँग्रेस आमदार शदर रणपिसे यांनी जोगेंद्र कवाडे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मात्र संख्याबळाचा गणित जुळत नसल्याने उमेदवारी मागे घेतली. अर्थात शरद रणपिसे यांनी आपण आपला प्रस्ताव मागे घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर नीलम गोऱ्हे यांची निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणुकीच्या तोंडावर कटुता पसरु नये म्ह्णून आपण आपल्या नावाचा प्रस्ताव मागे घेण्यास सांगितले असल्याचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हणले आहे. नीलम गोऱ्हे या शिवसेनेचा पुरोगामी चेहरा आहेत. त्यांनी फुले शाहू आंबेडकरी विचाराने काम करावे. तसेच एक महिला उपसभापती झाली असल्याने आपल्याला आनंद झाला आहे असे कवाडे यांनी म्हणले आहे.
नीलम गोऱ्हे यांच्या सारखी अभ्यासू महिला उपसभापती पदावर विराजमान झाल्याचा आपल्याला अंत्यत आनंद होत आहे अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. मागील पाच वर्षांपासून नीलम गोऱ्हे यांचे नाव मंत्री मंडळात समाविष्ट करण्याच्या मुद्द्यावर राजकीय वर्तुळात चर्चा झडल्या मात्र त्यांचा मंत्री मंडळात समावेश झाला नाही. तर पैसेवाल्या नेत्यांना शिवसेना पदं बहाल करते असा आरोप विरोधांनी केल्यामुळे कदाचित नीलम गोऱ्हे यांचे नाव उपसभापती पदासाठी निश्चित केले असावे असा राजकीय जाणकारांनी कयास बांधला आहे.