भोपाळ ( मध्य प्रदेश )| रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेस पक्षावर चांगलीच फटकेबाजी केली आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार विश्वास सांरग यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी यांच्यासह नेहरु गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली.
विश्वास सारंग म्हणाले की, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही अथवा फोटो नाही ज्यामध्ये राहुल गांधी हातावर राखी बांधताना दिसत आहेत. या प्रकारचा कोणता फोटो मी अद्याप पाहिलेला नाही. जर तुमच्यापैकी कोणी असा फोटो बघितला असेल तर फोटो मला दाखवा, आणि बक्षीस मिळावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. फक्त निवडणुका येतील तेव्हा गांधी कुटुंब मंदिरात जाऊन फोटो काढण्याचे काम करतात, अशी टीकाही त्यांनी केली.
तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या राखी बांधण्यावरुन ते म्हणाले की, काँग्रेस नेते कधीही रक्षाबंधन साजरा करतांना दिसत नाही. ते लोक इटलीची प्रथा मानतात. इटलीची प्रथा-परंपरा, संस्कृती आत्मसात करणारे सत्तेत आल्यास असेच चित्र बघायला मिळेल असा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान रक्षाबंधन हा सण हिंदू संस्कृतीशी जोडला आहे. त्याच्याशी काँग्रेस नेत्यांना काहीही देणंघेणं नाही. हे लोक केवळ राहुल गांधी आणि सोनिया गांधी जो आदेश देतील तेच पाळतात. मात्र भाजप सरकारच्या कार्यकाळात शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना त्यांच्या निवासस्थानी रक्षाबंधनाचा मोठा कार्यक्रम केला जायचा. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला मुख्यमंत्र्यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी यायच्या. मात्र काँग्रेसच्या काळात असा कोणताही उत्साह, जल्लोष दिसला नाही असा टोला सारंग यांनी लगावला.