मुंबई ही महाराष्ट्राची केवळ प्रशासकीय राजधानीच नव्हे तर ती आर्थिक राजधानीही आहे. आणि फक्त महाराष्ट्राचीच नव्हे तर देशाचीही ती आर्थिक राजधानी आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचं प्रतीक अथवा एक विधान म्हणूनही मुंबईचा लौकीक आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे 3 कोटी 29 लाख आहे. मुंबई हे भारताच्या व दक्षिण, पश्चिम आणि मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील पाचवे सर्वांत मोठे शहर आहे. मुंबई शहराला नैसर्गिक बंदर लाभलेले असून या बंदरातून भारताची सागरी मार्गाने 50% मालवाहतूक होते. 18व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कोलाबा लहान कोलाबा, माहीम, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली. 19व्या शतकात मुंबईची आर्थिक व शैक्षणिक प्रगती झाली आणि 20व्या शतकामध्ये स्वातंत्र्य चळवळीचा पाया मुंबईतच मजबूत झाला. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. नंतर 1960 साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले.
मुंबई ही भारताची आर्थिक व मनोरंजनाची राजधानी आहे. मुंबईमध्ये गरीब ते श्रीमंत या मधील सर्व वर्ग दिसून येतात. सध्याच्या जागतिकीकरणात मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर बनले आहे. मुंबईची स्थापना करणाऱ्या मूळ कोळ जमातीच्या लोकांचे येथे वास्तव्य होते. आजही मुंबई शहरात कोळी जमातीच्या लोकांचे वास्तव्य दिसून येते. मुंबई बेट पोर्तुगीज साम्राज्याकडे सुपूर्द करण्यापूर्वी आणि त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यापूर्वी 1661 मध्ये इंग्लंडच्या चार्ल्स दुसरा याने ब्रॅन्झाच्या कॅथरीनशी लग्न केले आणि तिचा हुंडा म्हणून चार्ल्सने टॅन्गियर बंदर प्राप्त केले आणि मुंबईची सात बेटे दिली. 18 व्या शतकाच्या मध्यभागी हॉर्नबी व्हेलार्ड प्रकल्पातून बॉम्बेचे आकार बदलले गेले. शेवटी समुद्रापासून सात बेटांमधील परिसराची पुनःप्राप्ती झाली व मुंबई हे एकच बेट झाले.
रिझर्व्ह बँक, मुंबई शेअर बाजार, राष्ट्रीय शेअर बाजार या महत्त्वाच्या आर्थिक संस्था या शहरात आहेत. मुंबईत अनेक अग्रगण्य देशी व विदेशी कंपन्यांची मुख्य कार्यालये आहेत. बॉलिवूड हे मनोरंजनाचे आर्थिक केंद्रही मुंबईतच आहे ज्याने जगभरात भारताचे नाव पोहोचवले आहे. येथे व्यवसाय व नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असल्याने देशाच्या इतर भागातून मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. भारताच्या 10% कारखाना-रोजगार, 40% प्राप्तिकर, 20%केंद्रीय कर, 60 % आयात कर, 40 % परदेश व्यापार आणि 40 अब्ज रुपये व्यावसायिक कर एकट्या मुंबईतून येतो. 1980 पर्यंत कापड गिरणी ही मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा होती. परंतु आता अभियांत्रिकी, सेवा उद्योग, दागिने पॉलिशिंग, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान ही क्षेत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात.
मुंबईला राजधानीचा दर्जा मिळाल्यामुळे केंद्रीय व राज्य सरकारी नोकर यांचेही नोकरदार वर्गातील प्रमाण लक्षणीय आहे. मुंबईत भरपूर प्रमाणात कुशल व अकुशल कामगार उपलब्ध आहेत. त्यांचे व्यवसाय प्रामुख्याने फेरीवाले, टॅक्सी वाहक, मॅकेनिक व इतर आहेत. मुंबईतील बंदरामुळे खूप लोकांना रोजगार मिळाले आहेत. मुंबईच्या प्रगतीत राज्यातीलच नव्हे तर देशातलाही लोकांचा सहभाग सर्वकाळ राहिलेला आहे. मात्र सवंग राजकारणासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा तसेच परंप्रांतिय लोकांच्या मनांत मराठी माणसाविषयी द्षेव पसरवण्याचा प्रयत्न काही लोक वारंवार करत आले आहेत. या सर्व घडामोडींना मुंबई पुरुन उरेल यात मात्र शंका नाही.
– प्रतिक पुरी
माहिती संदर्भ : इंटरनेट