हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना महामारीच्या काळात आरोग्यव्यवस्था दिवसेंदिवस कोलमडलेली असताना याही काळात पैशांनी बेड विकत देणाऱ्या नामांकित हॉस्पिटलमधील टोळीचा पर्दाफाश करण्यात सपोर्ट फॉर कोविड पेशंट, स्नेहबंध Whatsapp ग्रुप आणि हॅलो महाराष्ट्रच्या टीमला यश आलं आहे. इस्लामपूरमधील प्रकाश हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये च्या नावाने हा धक्कादायक प्रकार चालत असल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात ग्रुपच्या सदस्यांनी एजंटशी बोलणं केलं असता त्याने बेडची माहिती देतानाच हा प्रकार उघडकीस आला आहे. पेशंट वाचवायचाय? व्हेंटिलेटर पाहिजे? मग दीड लाख कमिशनची सोय करा असं सांगत एजंटांकरवी लाखो रुपयांची माया जमवली जात आहे. कोरोनारुग्णांच्या टाळूवरचं लोणी खायला एजंटांची टोळी सक्रिय झाल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट आहे. यामध्ये हाॅस्पिटल प्रशासनही सहभागी आहे का याबाबत अद्याप स्पष्टीकरण मिळू शकलेलं नाही.
याशिवाय त्याठिकाणी उपचार घेणाऱ्या पेशंटच्या नातेवाईकांनीही याबाबत जबाब दिला असून या सर्व घटनेच्या ऑडियो क्लिप्स हॅलो महाराष्ट्र टीमकडे उपलब्ध आहेत. कोरोना महामारीच्या काळात पैसे देऊन व्हेंटिलेटर बेडची जागा देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने पश्चिम महाराष्ट्रासह राज्यात खळबळ उडाली आहे. याबाबत प्रशासनाकडून कोणती कारवाई होणार? व्हीआयपी म्हणून शिल्लक ठेवलेले व्हेंटिलेटर बेड सामान्य नागरिकांसाठी वापरात येणार का याकडेच आता जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे.
मागील महिनाभरात राज्यातील सरकारी, खाजगी दवाखाने पेशंटच्या संख्येने ओव्हरफ्लो झाले आहेत. सरकारी दवाखान्यांत तर काही ठिकाणी एकाच बेडवर २ ते ३ पेशंट उपचार घेत असल्याचंही विदारक चित्र समोर आलं आहे. जवळपासच्या २ ते ३ जिल्ह्यांतील ५ ते ६ पेशंट दररोज व्हेंटिलेटरअभावी तडफडून मरत असताना प्रकाश हॉस्पिटलमध्ये मात्र पैसे घेऊन बेड देण्याचा गलिच्छ प्रकार समोर आला आहे.
इथून उपचार घेऊन बरे झालेल्या २ नातेवाईकांशी सपोर्ट फॉर कोविड पेशंट आणि स्नेहबंध ग्रुपच्या सदस्यांनी संपर्क साधला असता त्यांनी खालील घटनाक्रम नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितला. हे नातेवाईक सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आहेत.
या प्रकरणात एजंट म्हणू काम करणारे आनंद जाधव हे साताऱ्यातील रहिवासी असून त्यांचा ऍम्ब्युलन्स व्यवसाय आहे. मागे एक पेशंट प्रकाश हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर त्यांना या प्रकाराची माहिती मिळाली आणि त्यानंतर हा प्रकार पुढे चालूच राहिला.
काय होतं नेमकं बोलणं –
पेशंटचे नातेवाईक – दादा, लई आशेनं फोन केलाय तुम्हाला, आमचा पेशंट लई सिरीयस हाय..तुमच्याकडं काही बेडची सोय होत असली तर बघा की..दुपारी ४ वाजल्यापासून समद्या जिल्ह्यात चकरा मारल्या, पण कुठंसुद्धा बेड मिळाला नाही.
एजंट (जाधव) – बरं, बघू काय होतंय ते..काय नाव म्हणाला पेशंटचं? —
पेशंट माहिती देतात
एजंट – कुठून बोलताय? ऑक्सिजन लेवल कितीय? — सध्या ऍडमिट आहे दवाखान्यात की घरीच आहेत? —
पेशंट माहिती देतात.
एजंट – Ct स्कोअर कितीय सांगा बरं एकदा..? अच्छा १५ आहे का, मग बरोबर व्हेंटिलेटर बेड लागणारच..
एक काम करतो, बेड आहे का बघतो आणि ५ मिनिटांनी परत फोन करतो.
परत फोन येतो.
एजंट – ऐका बेडचं काम झालं आहे तुमचं. तुम्हाला कधी पाहिजे ते मला फिक्स सांगा फक्त.. आणि हो एक गोष्ट आहे, तुम्हाला दवाखान्यात ऍडमिट होताना दीड लाख रुपये कॅश द्यावी लागेल बरं का..
पेशंटचे नातेवाईक – काय, एवढे पैसे?
एजंट – हो, सध्या एकच बेड शिल्लक असून त्यासाठी ४ जणांनी फोन केलाय. तुमचं कन्फर्म करायचं असेल तर सांगा तसं मी पुढं कळवतो. आणि हो हे दीड लाख भरल्यावर पावती बिवती काही मिळणार नाही. दवाखान्यात तुम्हाला सगळ्या सोयीसुविधा मिळतील, अगदी रेमडिसिव्हरचीही अडचण येणार नाही. पण ते दीड लाखांचं काम करावंच लागेल. शिवाय रोजचा दवाखान्याचा खर्च साधारण १५ हजार रुपये होईल. पेशंट जितक्या दिवस ऍडमिट असेल तितके दिवस बिल वाढत जाईल.
हा संवादानंतर पेशंटच्या नातेवाईकांना एक फोन नंबर दिला जातो आणि त्यावर पुढील बोलणं करायला लावलं जातं. दवाखान्यात गेल्यानंतर त्या डॉक्टरांच्या/व्यवस्थापनाच्या केबिनमध्ये प्रवेश करताना मोबाईल वगैरे बाजूला ठेवायला लावतात. पैशांच्या देवाण-घेवाणी बाबतचं बोलणंच फक्त या ठिकाणी करायचं असा नियम आहे. हे बोलणं रणधीर सर यांच्याशी होत असून त्यांच्या बोलण्याचे डिटेल्सही नातेवाईकांनी दिले आहेत.
प्रकाश हॉस्पिटलमध्ये रेग्युलर पद्धतीने व्हेंटिलेटर बेड उपलब्ध आहेत का असं विचारल्यानंतर त्यांनी प्रवीण माने आणि अक्षय पाटील या संबंधितांशी बोलणं करायला सांगितलं. त्यांच्याशी संपर्क केला असता दोघांनीही सध्या कुठेच व्हेंटिलेटर बेड ऍडजस्ट होऊ शकत नाही असं सांगितलं.
एकाच दवाखान्यात बेड उपलब्ध नाही असं सांगणं आणि दुसरीकडे एजंट लोकांतर्फे उपलब्ध असलेले बेड दीड लाख रुपयांना विकणं हा गंभीर प्रकार याठिकाणी उघडकीस आला आहे. या घटनेची दखल तातडीने घेण्याची मागणी सपोर्ट फॉर कोविड पेशंट आणि स्नेहबंध ग्रुपतर्फे ग्रुपतर्फे किरण तांबे, योगेश जगताप, नम्रता पाटील रोहित मोहिते, मेघना देशमुख यांनी केली आहे.
मॅनेजमेंट कोटा ही काय भानगड – प्रकाश हॉस्पिटलमध्ये vip आणि मॅनेजमेंट कोटा असून जास्त पैसे भरून इमर्जन्सी उपचार घ्यायचे असतील तर त्या कोट्यातून प्रवेश देतात असं आनंद जाधव सांगत होते. तुमच्याकडे पैसे नसतील तर ऍडजस्ट करा, कुठूनही करा पण पैसे भरल्याशिवाय व्हेंटिलेटर बेड मिळणारच नाही हाच त्यांच्या बोलण्याचा रोख होता.
कोविड काळात खाजगी दवाखान्यांनी घ्यायच्या रकमेबद्दल शासनाने काही नियम घालून दिलेले असताना पैसे घेऊन बेड विकण्याचा हा प्रकार राजरोसपणे चालू आहे. या प्रकरणात सहभागी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी पेशंटच्या नातेवाईकांनी आणि कोविड सपोर्ट ग्रुपने केली आहे.
शनिवारी रात्रीपासून 3 पेशंटला व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी फोनाफोनी सुरू होती. एका सहकाऱ्याने आनंद जाधव यांचा नंबर दिला असता त्यांच्याकडून या दीड लाखांच्या प्रकरणाची माहिती मिळाली. एकदम सणक गेली डोक्यात..इथं पेशंट तडफडून जीव सोडत असताना व्हेंटिलेटर देऊन पैसे उकळण्याचा प्रकार गंभीर आहे. गरिबांनी पैसे नाहीत म्हणून जगायचंच नाही का? या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात यावी.
– किरण तांबे, सामाजिक कार्यकर्ते (सपोर्ट फॉर कोविड पेशंट)
माझ्या ओळखतील एका बऱ्या झालेल्या पेशंटनी मला सांगितलं की इस्लामपूरच्या दवाखान्यात ऍडमिट करा. पैसे भरली की तिथे सोय होतेय. हा प्रकार नक्की काय आहे हे समजून घेण्यासाठी मी संबंधित व्यक्तीला फोन लावला असता ही धक्कादायक घटना समोर आली. मी काम करत असलेल्या ग्रुपमध्ये सेवाभावी वृत्तीने काम करणारे लोक आहेत. आपला पूर्ण दिवस खर्ची घालून ते एक एक बेड, प्लाझ्मा बॅग मिळवून देतायत. इथे केला जाणारा जीवाचा सौदा पाहून ‘मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांचीच’ ही जमात असल्याचं दिसून आलं. प्रशासनाने यावर तात्काळ पावलं उचलून हे गैरप्रकार थांबवावेत.
– नम्रता पाटील (कोल्हापूर), मेघना देशमुख (सातारा)