युवकाची निर्घृणपणे हत्या : दारू पिताना झालेल्या भांडणातून घडली घटना

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहराजवळील चौंडेश्‍वरी नगर, गोवारे (ता. कराड) येथील मळी नावाच्या शिवारात दारु पिताना झालेल्या भांडणात कराड नगर पालिकेच्या घंटा गाडीवर काम करणार्‍या युवकाचा त्याच्याच मित्राने गुप्तीने वार करुन व दगडाने ठेचून खून केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. किरण मुकुंद लादे (वय 21, रा. बुधवार पेठ, कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.याप्रकरणी त्याचा मित्र आकाश गवळी (रा. चौंडेश्‍वरी नगर, गोवारे, ता. कराड) याच्यावर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कुंदन लादे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहीती अशी, किरण लादे हा येथील नगरपालिकेच्या घंटा गाडीवर कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होता. शुक्रवारी रोजी सकाळी 06.30 ते 07.00 वाजणेचे सुमारास किरण हा नेहमीप्रमाणे घंटागाडीवर कामास गेला होता. त्यानंतर तो दुपारी घरी आला व जेवणखाण करून बाहेर गेला होता. मात्र तो रात्री उशीरापर्यंत घरी आला नाही. याबाबत घरच्यांनी किरण यास फोन केला, मात्र त्याचा फोन बंद येत होता.

शनिवारी सकाळी 11.30 वाजणेचे दरम्यान घंटागाडीचे मुकादम चव्हाण यांनी किरणचा भाऊ कुंदन यांना फोन करुन तु, चौडेश्वरीनगर, गोवारे येथे ये असे सांगीतले. चौडेश्वरीनगर, गोवारे येथे कुंदन गेला असता, तेथे पुलाच्या पश्चिमेस ओढयाकडे जाणारे रोडवर भाऊ किरण लादे याचे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्याच्या निदर्शनास आले. किरणच्या कपाळात, डोक्यात मोठया जखमा होवून रक्त आले होते. याबाबत पोलिसांनी अधिक माहीती घेतली असता शुक्रवारी रात्री 7.30 वाजणेच्या सुमारास किरण व त्याचा मित्र आकाश गवळी हे दारु पिण्यासाठी एकत्रित आले होते. त्यांच्यात दारु पीत असताना वाद होवून भांडण झाले. त्या भांडणाच्या कारणाने आकाश गवळी यानेच किरण लादे यास चौंडेश्वरीनगर, गोवारे येथे घेवुन जावुन त्याचा खुन केला असावा असल्याची माहीती प्राथमिक दर्शनी समोर आली आहे. पोलिसांकडून संशयीताचा शोध सुरु आहे. पोलिसांना पंचनामा करुन संबंधित युवकाचा मृतदेह येथील स्व.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात येथे शवविच्छेदनासाठी पाठवला होता. बुधवार पेठेत खबरदारी म्हणून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.